हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखरेची पातळी कमी होणे) यावर घरी उपचार कसे करावेत
हायपोग्लायसेमिया म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी कमी होणे. टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह या दोन्ही प्रकारच्या मधुमेहाचे हे एक स्वाभाविक लक्षण आहे.
मधुमेहाचे पेशंट जे इन्सुलिन ट्रिटमेंटवर आहेत किंवा टाइप 2 मधुमेहावर उपचारासाठी काही प्रकारच्या डायबेटिक रोधक गोळ्या-औषधे घेत आहेत, त्यांना हायपोग्लायसेमिया होण्याचा संभव जास्त आहे.
अशा औषधांमध्ये sulphonylureas ( glimeperide, gliclazide, glibenclamide or glyburide & glipizide) किंवा megitinides ( repaglinide, nateglinide) या इन्सुलिन वर्धक औषधांचा हायपोग्लायसेमिया हा साइड इफेक्ट असू शकतो.
माझ्या मागील लेखांमध्ये आपणास अजून औषधांबद्दल माहिती मिळेल की ज्यांच्यामुळे हायपोग्लायसेमिया किंवा हायपोग्लायसेमियाचे लक्षणे दिसू शकतात.

हायपोग्लायसेमिया किंवा रक्तातील साखर कमी होणे, याला सामोरे कसे जावे ?
1. हायपोग्लायसेमिया ची लक्षणे ओळखा –
हायपोग्लायसेमिया ची लक्षणे प्रत्येक व्यक्तींनुरूप बदलतात. त्यामुळे हायपोग्लायसेमिया ची सविस्तर लक्षणे आपण मागील लेखात नमूद केलेली आहेत. प्राथमिक स्थितीमध्ये हायपोग्लायसेमिया अति घाम येणे, हृदयाच्या ठोक्यात मध्ये वाढ होणे, चक्कर आल्यासारखे वाटणे, गोंधळ उडणे, विकनेस येणे, राग आल्यासारखे वाटणे या लक्षणांवरून ओळखला जाऊ शकतो.
2. लक्ष वेधून घ्या –
हायपोग्लायसेमिया च्या प्राथमिक लक्षणांमध्ये गोंधळ उडणे – चक्कर आल्यासारखे वाटणे या लक्षणांचा समावेश होतो. त्यामुळे जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही हायपोग्लायसेमिया चे बळी होत आहात, तर सर्वात आधी आपल्या घरच्यांचे किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांचे लक्ष वेधून घ्यावे. त्यांना तुमच्या लक्षण बद्दल सांगून ठेवा. जेणेकरून चक्कर आल्यानंतर तुम्ही बेशुद्ध जरी झालात तरी तुम्हाला योग्य वैद्यकीय मदत मिळू शकेल. जर तुम्ही वाहन चालवत असाल तर ते रस्त्याच्या बाजूला घेऊन थांबून घ्या. जर तुम्ही चालत असाल किंवा पाहिल्या खेळत असाल तर तिथल्या तिथे थांबून जागेवर बसून घ्या. तुमची आणि तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची सेफ्टी हे तुमचे प्राथमिक उद्दिष्ट ठेवा.
3. चाचणी करून कन्फर्म करून घ्या –
तुमची केपिलीरी ब्लड शुगर लेव्हल ग्लुकोमीटर ने बोटाला टोचून चेक करून घ्या. जर ग्लुकोमीटर वर 70 mg/dl किंवा त्यापेक्षा कमी रीडिंग आले तर तुम्ही हायपोग्लायसेमिया ला बळी पडलेल्या आहात हे कन्फर्म होते जर तुमच्याकडे ग्लुकोमीटर नसेल तर पुढील स्टेप वर जा.
4. साखर किंवा तत्सम पदार्थांचे सेवन करा –
हायपोग्लायसेमिया म्हणजेच म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यानंतर ते पूर्ववत करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे असे कार्बोहायड्रेट जे शरीरामध्ये पटकन विरघळतात जसे किन साखर यांचे सेवन करावे. मी माझ्या पेशंटस्ना Glucon-D पावडर (हिरवा डबा) चे दोन तीन चमचे जिभेवर ठेवून चघळण्यास सांगतो. त्याने शरीरातील ब्लड शुगर लेवल लगेच वाढते. भारतामध्ये ग्लुकोजच्या गोळ्या सगळीकडेच भेटतात असे नाही म्हणून खबरदारी म्हणून पंधरा-वीस ग्राम आपली साधी साखर किंवा Glucon-D कायम सोबत ठेवले डायबेटिक पेशंटसाठी चांगले. जर तुम्ही इन्सुलिन किंवा sulfonylurea सारख्या औषधांवर असाल तर तुम्ही ह्या गोष्टी जवळ नक्कीच बाळगाव्यात.
घरात सहजरीत्या असणाऱ्या खालील काही गोष्टी शरीरातील ब्लड शुगर लेवल वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
- अर्धा कप फळांचा ज्यूस.
- एक कप दूध.
- एक ते दोन टेबलस्पून मध.
- अर्धा कप सोडा किंवा सॉफ्ट ड्रिंक.
- दोन टेबलस्पून मनुका.
- पाच ते सहा हार्ड कॅंडीज
- तीन-चार चॉकलेट्स (डेरीमिल्क – ईक्लेयरस वगैरे).
5. परत मोजून बघा –
शरीरातील ब्लड शुगर लेव्हल कमी झाल्यानंतर तुम्ही ती वाढवण्यासाठी खूप पण गोड पदार्थ खाऊ नका, नाहीतर अचानकच शुगर लेवल खूपच वाढेल. पंधरा-वीस मिनिटे थांबून तुम्ही ब्लड शुगर लेव्हल परत एकदा चेक करा. ती जर 70 mg/dl पेक्षा कमी असेल तर परत 15-20 gm साखर किंवा Glucon-D चे सेवन कराव. अशाप्रकारे जोपर्यंत तुमची ब्लड शुगर लेव्हल 70mg/dl पेक्षा जास्त होत नाही तोपर्यंत हा क्रम सुरू ठेवावा. तुम्हाला हायपोग्लायसेमिया चा त्रास झाल्यानंतर एक तासाच्या आत तुमचे जेवण उरकून घ्यावे. जर जेवणाची वेळ जवळपास नसेल तर कार्बोहायड्रेट्स पूरक अन्नपदार्थ खाऊन घ्यावे.
6. तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी –
जर तुमच्या शरीरातील ब्लड शुगर लेव्हल वरील उपाय करूनही वाढली नाही आणि तुमचे चक्कर येणे किंवा गर्गरणे या लक्षण मधून पुढच्या स्टेजवर गेल्यात जसे की, शुद्ध हरपणे तर तातडीने वैद्यकीय मदत मिळणे अपेक्षित आहे. तुमच्या परिवाराने किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांनी अशावेळी जवळील हॉस्पिटलमध्ये तुम्हाला हलवणे योग्य राहील. हॉस्पिटलमध्ये तुम्हाला इमर्जन्सी डिपार्टमेंट मध्ये Intravenous glucose/glucagon इंजेक्शन चा उपयोग करून ब्लड शुगर लेव्हल वाढवण्याचा प्रयत्न होतो.
7. हायपोग्लायसेमिया होऊच नये यासाठी प्रयत्न करणे आणि प्रतिबंध करणे –
जर तुमच्या शरीरातील ब्लड शुगर लेव्हल सारखे सारखे कमी होत असेल, तुम्हाला हायपोग्लायसेमियाला सारखे सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटणे अपेक्षित आहे. तुम्हाला एकदा जरी उच्च पातळीचा हायपोग्लायसेमिया अटॅक आला असेल तरी तुम्ही डॉक्टरांना भेटावे. डॉक्टरांना भेटून तुमच्या गोळ्या-औषधे आणि इन्सुलिनचे डोस तुमच्या दिनचर्या प्रमाणे परत एकदा ठरवून घ्यावेत. डॉक्टर सोबत चर्चा करून भविष्यात पुन्हा असे होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय योजना करून घ्यावी.
तुम्हाला जर हा लेख आवडला असेल मदत पूर्ण वाटला असेल तर परिवार जण आणि मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा तुमचा फीडबॅक आणि कौतुक दोन्ही स्वागताहार्य आहे..🙏🏻